>> राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, दिवसभरात 39,624 रुग्णांना डिस्चार्ज: कालच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट पहायला मिळाली आहे. त्याचबरोबर दिवसभरात 39,624 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आजपर्यंत एकूण 29,05,721 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.21 टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
>> पंधरा दिवसांच्या निर्बंधांनी काय होणार? महाराष्ट्रात लशीकरणासाठी लागणार सहा महिने: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस राज्यात 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सध्या देशात आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येपैकी एकतृतीयांश रुग्णसंख्या ही एकट्या महाराष्ट्रातून सापडत आहे तर नव्या मृतांपैकी एक चतुर्थांश मृत रुग्ण हे महाराष्ट्रातीलच आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक लशीकरण करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1.1 कोटी डोस दिले गेले आहेत परंतु परिस्थितीची तीव्रता पाहता यापेक्षा जास्त मागणी आहे.
>> सीबीआय चौकशीत अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) समन्स बजावले होते. त्यानुसार बुधवारी नऊ तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. याबाबत सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आरोपामुळेच देशमुखांना मंत्रिपद सोडावे लागले होते.या चौकशीवेळी सिंग यांच्या आरोपांबाबत देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच वाझेला वसुलीसाठी टार्गेट देण्यात आले होते का? याबाबतही विचारणा करण्यात आली. इतर अधिका-यांनाही अशा प्रकारे टार्गेट देण्यात आले होते का? याबाबत कोणाचा दबाव होता का?आदी आरोपांबाबत विचारणा करण्यात आली.दरम्यान, देशमुख यांनी बहुतांश आरोप फेटाळले. यावेळी आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा देशमुखांचा दावा चौकशीत केला. परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी पत्र लिहल्याचेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
>> शांतता, संचारबंदी लागू आहे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई: ‘ब्रेक द चेन’मधील (Break The Chain) निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यच्या सूचना दिल्या. राज्यात (Maharashtra) दोन आठवड्यांचा ‘ब्रेक द चेन’ या कडक निर्बंधांना आज रात्री ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी काल (ता. १३) जनतेशी संवाद साधताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. आज नियमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. त्या वेळी अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरोघरी साजरी; गर्दीला फाटा देत बुद्धविहारात ऑनलाइन प्रबोधन: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचे पालन करीत शहरवासियांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरोघरी साधेपणाने साजरी केली. रस्त्यावर कोठेही गर्दी, जल्लोष नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहारार्पण करून अभिवादन करण्यात आले. सोमवारी मध्यरात्री १२ नंतर मोजकेच फटाके वाजवून महामानवाला वंदन करण्यात आले. अनुयांनी सकाळपासूनच रांगेतूनच दर्शन घेत त्यांच्या चरणी हार-फुले वाहिली. रात्रीपासूनच पुतळा परिसरात गर्दी होणार नाही, याची पोलीस प्रशासनाने कटाक्षाने काळजी घेत पुतळ्याला बॅरिकेडने वेढले होते. दरवर्षी गजबजणारे सर्व चौक शांत होते.