माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज 26 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सायंकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 वे पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते सलग दहा वर्षं देशाचे पंतप्रधान राहिले.
केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान. डॉ सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे.

पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
"भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून उदयास आले. देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले. देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमीट छाप होती. संसदेत त्यांनी केलेली भाषणं अभ्यासपूर्ण होती. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मी मार्गदर्शक गमावला- राहुल गांधी
"मनमोहन सिंग यांनी त्यांची अत्युच्च बुद्धिमत्ता आणि सचोटीच्या बळावर देशाचं नेतृत्व केलं. त्यांचा नम्रपणा आणि अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.
मी एक मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचे कोट्यवधी हितचिंतक मोठ्या अभिमानाने त्यांना स्मरणात ठेवतील.", अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉ. सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताने अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला- मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत भावनिक शब्दांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतिंना उजाळा दिला आहे.
ते लिहितात"इतिहास तुमच्याकडे अधिक करुणेने पाहील यात शंका नाही, डॉ. मनमोहन सिंग जी!
माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, निर्विवाद सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला आहे.
त्यांच्या आर्थिक उदारीकरण आणि हक्कांवर आधारित कल्याणकारी धोरणाने कोट्यवधी भारतीयांचे जीवन आमूलाग्र बदलले, भारतात एक मोठा मध्यमवर्ग निर्माण केला आणि कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले."