विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या
स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्यरूप असे म्हणतात.
नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.
हा बदल पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो.
उदा.
१) कावळा :- कावळ्यास, कावळ्याला, कावळ्याने, कावळ्याचा.
या सर्व शब्दांमध्ये कावळ्या हे सामान्यरूप आहे.
२) समुद्र :- समुद्रास, समुद्राला, समुद्राने, समुद्राचा.
या सर्व शब्दांमध्ये समुद्रा हे सामान्यरूप आहे.
आणखी काही उदाहरणे-
बाळ - बाळाला, घोडा - घोड्याचा, तळे - तळ्यात, पाणी - पाण्यात, फडके - फडक्यांचा इत्यादी
१. मूळ शब्दातील अंत्य स्वर ह्रस्व असला तर सामान्यरूपाच्या वेळी तो दीर्घ होतो.
उदाहरणार्थ
कवि – कवीस, कवीने, गुरु - गुरूचा
२. अनेकवचनी शब्दांच्या सामान्यरूपावर नेहमी अनुस्वार येतो.
उदाहरणार्थ
मुलांना,पशुत,घोड्यांना, शहरांतून इत्यादी.
३. विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्यरूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही सामान्यरूप होते.
उदाहरणार्थ
घर – घराजवळ, घरापुढे, तळे - तळ्यामध्ये, घोडा - घोड्यासाठी, शाळा - शाळेविषयी,
सामान्यरूपाचे विविध प्रकार
पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप
१. ‘अ’ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारांत होते.
उदाहरणार्थ
खांब-खांबास, निर्णय-निर्णयास, काळ-काळाने, वर्ग-वर्गात,हात - हातात, घर - घरास, घराने, झाड - झाडास, झाडाने, झाडाला
२. ‘आ’ कारांत पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ‘या’ कारांत होते.
उदाहरणार्थ
घोडा-घोड्याला, कोयता-कोयत्याने, दोरा-दोन्याचा, झरा - झऱ्याला, झऱ्याने, दोरा – दोऱ्यास, दोऱ्याने, डोळा-डोळ्यास, डोळ्याने
अपवाद: आजोबा, दादा, काका, मामा, राजा, यांचे सामान्यरूप होत नाही.
३. ‘ई’ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारांत होते.
उदाहरणार्थ
तेली-तेल्याने, माळी-माळ्याचा, पाणी - पाण्याला, पाण्यास, धोबी - धोब्याला, धोब्यास, कोळी - कोळ्याचा
अपवाद: हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी.
४. ‘इ’ कारांत व ‘उ’ कारांत तत्सम शब्द दीर्घान्त लिहावयाचे असल्यामुळे त्यांचे सामान्यरूप दीर्घान्तच राहते.
उदाहरणार्थ
कवी-कवीला, गुरु-गुरूला, साधू-साधूचा, नीती-नीतीला
५. ‘ऊ’ कारांत पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ‘वा’ कारांत होते.
उदाहरणार्थ
भाऊ-भावांनी, विंचू-विंचवांनी, नातू-नातवांचा
अपवाद - पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशु
६. ‘ए’ कारांत पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ‘या’ कारांत होते.
उदाहरणार्थ
फडके-फडक्यांचा, गोखले-गोखल्यांचा, पोरे-पोर्यांनी
७. ‘ओ’ कारांत पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ‘ओ’ कारांतच राहते.
उदाहरणार्थ
किलो-किलोस, धनको-धनकोचा, बिटको-बिटकोने
स्त्रीलिंगी नामांचे सामान्यरूप
१. ‘अ’ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ‘ए’ कारांत व अनेकवचनात ‘आ’ कारांत होते.
उदाहरणार्थ
वीट-विटेचा, विटांचा, जीभ-जिभेला, जिभांनी
२. काही ‘अ’ कारांत स्त्रीलिंगी नामांची सामान्यरूपे ‘ई’ कारांत होतात.
उदाहरणार्थ
भिंत-भिंतीला, विहीर-विहिरीत
३. ‘आ’ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ‘ए’ कारांत होते.
उदाहरणार्थ
शाळा-शाळेत, भाषा-भाषेचा, माता-मातेला, विद्या-विद्येने
४. ‘ई’ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ‘ई’ कारांत व अनेकवचनात ‘ई’ कारांत किंवा ‘या’ कारांत होते.
उदाहरणार्थ
भक्ती-भक्तीने, नदी-नदीचा,नद्यांचा, बी-बियांचा, पेटी-पेटीत, दासी-दासीला, दासींचा, स्त्री-स्त्रियांना
५. ‘ऊ’ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही क्वचित ते ‘वा’ कारांत होते.
उदाहरणार्थ
काकू-काकूला, वधू-वधूचा, सासू-सासूला, सासवांना
६. ‘ओ’ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात ‘आ’ कारांत होते.
उदाहरणार्थ
बायको - बायकोला, बायकांना
नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप
१. ‘अ’ कारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारांत होते.
उदाहरणार्थ
मूल-मूलाने, पान-पानाचा, दुकान-दुकानात, फुल-फुलात
२. ‘ई’ कारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप याकारांत होते.
उदाहरणार्थ
पाणी-पाण्यात, मोती-मोत्याचा, लोणी-लोण्याचा
३. ‘ऊ’ कारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारांत होते.
उदाहरणार्थ
लिंबू-लिंबाचे, कोकरू-कोकराने, लेकरू-लेकराला
४. काही ‘ऊ’ कारांत नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप ‘वा’ कारांत होते.
उदाहरणार्थ
कुंकू-कुंकवाचा, गळू-गळवाचा, आसू-आसवाने
५. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारांत होते.
उदाहरणार्थ
तळे-तळ्यात, केळे-केळ्यांची, खोके-खोक्यात, नाणे-नाण्यात
सामान्यरूप कधी होत नाही ?
१. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
उदाहरणार्थ
अ ने ब ला मारले.
२. परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप कधी कधी होत नाही.
उदाहरणार्थ
शेक्सपिअरची नाटके अद्यापही लोकांना आवडतात.
३. ग्राम किंवा देशवाचक विशेषनामांचे सामान्यरूप कधी कधी होत नाही.
उदाहरणार्थ
१. मी बनारसला शिक्षणासाठी गेलो.
२. ही वस्तू मी इंग्लंडहून आणली.
पण चतुर्थीचा स आणि सप्तमीचा त प्रत्यय लागताना सामान्यरूप होते.
जसे नागपूरनागपुरास, हिंदुस्थान-हिंदुस्थानात, पंजाब-पंजाबात इत्यादी
विशेषणांचे सामान्यरूप
१. ‘अ’ कारांत, ‘ई’ कारांत, व ‘ऊ’ कारांत विशेषणांचे सामान्यरूप होत नाही.
जसे
१. जगात गरीब माणसाला कोणी विचारात नाही.
२. त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
३. मला कडू कारल्याची भाजी आवडते.
४. मला कडू कारल्याची भाजी आवडते.
२. विभक्तीप्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे सामान्यरूप ‘या’ कारांत होते.
जसे
भल्या माणसाने, या मुलांचा, वेड्या मुलीने, खन्या गोष्टीस
उदा.
१. चांगला माणूस - चांगल्या माणसास
२. हा कुत्रा - ह्या कुत्र्यास