नवी दिल्ली: टाइम्स मासिकाने २०२२मधील १०० प्रभावशाली व्यक्तींची (times 100 most influential people) यादी जाहीर केली आहे. या यादीत तिघा भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. टाइम्स मासिकाच्या यादीत सर्वोच्च न्यायालयातील वकील करुणा नंदी(karuna nundy), उद्योगपती गौतम अदानी (gautam adani) आणि काश्मीरमधील मानवाधिकारासाठी लढणारे कार्यकर्ते खुर्रम परवेज (khurram parvez)यांचा समावेश आहे.
टाइम्स मासिकाने २०२२ची यादी जाहीर करताना सहा विभाग केले आहेत. यामध्ये आयकॉन, पायोनियर्स, टायटन्स, कलाकार, नेते आणि इनोव्हेटर्सचा समावेश आहे. गौतम अदानी यांचा समावेश टायटन्स विभागात करण्यात आलाय. यात अॅपलचे सीईओ टिम कुक आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रे यांचा देखील समावेश आहे. नंदी आणि परवेज यांना लीडर्स या विभागात ठेवण्यात आले आहे. याच विभागात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दोमिर जेलेंस्की यांचा समावेश आहे.
टाइम्सच्या मते करुणा नंदी फक्त वकील नाहीत. तर एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहेत. त्या न्यायालयाच्या आत आणि बाहेर देखील आवज उठवतात. महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या त्या चॅम्पियन आहेत. बलात्कार विरोधा आणि कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण यावर फार काम केले आहे.
अदानी ग्रुप बद्दल बोलताना टाइम्सने म्हटले आहे की, हा उद्योग समूह भारतात फार प्रभावशाली आहे. सर्वसाधारण गौतम सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहतात. ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर घेऊन जायची आहे आणि अदानींचा तर प्रवास आता सुरू झालाय.
जागतिक नेत्यांमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना देखील स्थान मिळाले आहे. ते या यादीत १३व्या स्थानावर आहेत. याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडेन, क्रिस्टिन लेगार्ड, टिम कुक यांना पाचव्यांदा टाइम्सच्या यादीत स्थान मिळवण्यात यश मिळाले आहे.