पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या
पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
पण एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीतील 2 हजारांचा हप्ता आणि यापुढील प्रत्येक हप्ता हा लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
त्यामुळे जर तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्याची रक्कम मिळवण्यास अडचण येऊ शकते.
महाराष्ट्राचे कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आहे.
यापैकी 88 लाख 74 हजार 872 लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. तर 17 लाख 78 हजार 283 लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाहीये.
त्यामुळे मग या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून पाहावं. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास ते त्वरित करून घ्यावं, असं आवाहन विनयकुमार आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.