कोलकाता : आयपीएलच्या ज्वर आता टिपेला पोहोचला आहे. पण आता गुजरात टायटन्सचा संघ हा फायनलमध्ये पोहोचू शकतो, असे म्हटले जात आहे.
गुजरातचा संघ थेट आयपीएलच्या फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो, जाणून घ्या...
आयपीएलच्या प्ले ऑफला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. या प्ले ऑफमध्ये पहिला सामना हा 'क्वालिफायर-१'चा होणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ एकमेकांशी दोन हात करणार आहेत.
या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, त्या संघाला थेट अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. पण सध्याच्या घडीला कोलकातामधील वातावरण बिघडलेले आहे. कोलकातामध्ये वादळाने मोठे नुकसान केले आहे आणि पाऊसही सुरु आहे. त्यामुळे मंगळवारी गुजरात आणि राजस्थान यांच्यातील सामना होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. जर गुजरात आणि राजस्थान या दोन्ही संघांत जर २० षटकांचा सामना झाला नाही तर किमान ५ षटकांचा सामना खेळवला जाणार आहे. जर पाच षटकांचा सामनाही झाला नाही, तर सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लावण्यात येणार आहे. पण जर एकही षटक यावेळी टाकले गेले नाही तर या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेतील स्थानावरून या सामन्याचा निकाल लावला जाईल.
गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल होता, तर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. त्यानुसार जर या सामन्यात एकही षटक टाकले गेले नाही तर या सामन्यात गुजरातला विजयी ठरवले जाऊ शकते आणि ते थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतात.
दुसरीकडे या नियमानुसार राजस्थानचा पराभव झाला असला तरी ते आयपीएलच्या बाहेर जाणार नाहीत. कारण या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला अजून एक संधी मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यात जरी राजस्थानचा संघ या नियमामुळे पराभूत झाला असला तरी त्यांना क्वालिफायर-२ या सामन्यात खेळावे लागेल आणि तिथे विजय मिळवला तरच त्यांना अंतिम फेरीचे दार खुले होऊ शकते.