Param Bir Singh: '३० वर्ष सेवा... तरीही पोलिसांवर विश्वास नाही हे धक्कादायक'- वाचा सविस्त
Type Here to Get Search Results !

Param Bir Singh: '३० वर्ष सेवा... तरीही पोलिसांवर विश्वास नाही हे धक्कादायक'- वाचा सविस्त



नवी दिल्ली : महाराष्ट्रात ३० वर्षांहून जास्त काळ सेवा बजावल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता राज्याच्या पोलिसांवर विश्वास नाही, असे म्हणणे हे धक्कादायक आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केली. 'आपल्याविरोधात सुरू असलेला विविध प्रकरणांतील तपास राज्याबाहेरील स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावा,' अशी मागणी करणारी याचिका परमबीर यांनी केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावले.


न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मणियन यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर परमबीर यांच्या याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने म्हटले, 'काचेच्या घरात राहणाऱ्याने इतरांवर दगडफेक करू नये, असा एक वाक्प्रचार आहे.' ही याचिका फेटाळून लावण्याचा आदेश आपण देऊ, असे न्यायालयाने म्हटल्यानंतर परमबीर यांचे वकील ज्येष्ठ अॅड. महेश जेठमलानी म्हणाले की, आम्ही ही याचिका मागे घेऊन अन्य योग्य उपायांचा विचार करू.
    परमबीर सिंह हे सन १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य होमगार्डच्या जनरल कमांडरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाचे आरोप केले. या पार्श्वभूमीवर अॅड. जेठमलानी म्हणाले की, परमबीर या प्रकरणात जागल्या आहेत म्हणून त्यांच्यावर एकामागोमाग खटले दाखल केले जाऊ शकत नाहीत. त्यांच्याविरोधात सुरू करण्यात आलेले विविध प्रकरणांतील तपास हे राज्याबाहेर हलविण्यात यावेत आणि ते सीबीआयसारख्या स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावेत, अशी परमबीर यांची मागणी असल्याचे जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर खंडपीठ म्हणाले, 'हे आमच्यासाठी आश्चर्यजनक आहे. परमबीर, तुम्ही महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहात आणि तुम्ही राज्यात ३० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे. आता तुम्ही म्हणता की, तुमचा तुमच्याच राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही. हे धक्कादायक आहे.'

सुनावणीदरम्यान अॅड. जेठमलानी म्हणाले की, परमबीर यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. परमबीर यांनी देशमुख यांच्यावर ज्या पत्राद्वारे आरोप केले आहेत, ते पत्र मागे घेण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. त्यावर खंडपीठाने सांगितले की, माजी मंत्र्यांविरोधातील चौकशी आणि तुमच्या (परमबीर) विरोधातील चौकशी या दोन भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही ३० वर्षांहून अधिक काळ पोलिस खात्यात सेवा केली आहे. तुम्ही पोलिस दलावर शंका घेता कामा नये आणि आता चौकशी राज्याबाहेर करण्यात यावी, असे देखील म्हणू शकत नाही.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section