🔴सकाळच्या ठळक बातम्या..०६.०४.२०२१
Type Here to Get Search Results !

🔴सकाळच्या ठळक बातम्या..०६.०४.२०२१

News Updates■



●मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 47 हजार 288 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 26 हजार 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी थोडीशी कमी असली तरीही राज्याची चिंता अद्याप कायम आहे. काल राज्यात 57 हजार 074 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले होते.


●वाशी (जि. उस्मानाबाद): कोठडीदरम्यान एका आरोपीची प्रकृती खालावून त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाशी ठाण्यावर अचानक हल्ला चढविला. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.


●मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यास मंजूरी दिली आहे.


●शिर्डी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या "ब्रेक दि चेन"  या धोरणांतर्गत आज, सोमवार सायंकाळपासून ते ३० एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.


●अमरावती : दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) ने फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मासोद येथे १२०० ते १५०० जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. स्फोटक पदार्थांचा हा साठा तीन वाहनांमध्ये भरून होता. पथकाने सोमवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणीची कसून चौकशी सुरू होती.


●बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. ४ एप्रिल रोजी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार ७७० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४७४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, १०२२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.


●नाशिक : गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सहा ते सात मित्रांच्या ग्रुपमधील दोन अल्पवयीन मित्रांचा जलाशयात सोमवारी (दि.5) संध्याकाळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे.


●सांगली : टॉन्सीलवरील उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील मुलीचा मृत्यू झाला. प्रतिक्षा सदाशिव चव्हाण (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. यानंतर नातेवाईकासह सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही गोंधळ घातला. डॉक्टरांच्या चूकीच्या उपचारामुळेच मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा बघून रूग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


●मूर्तिजापूर : तालुक्यातील कानडी बाजार येथे ठरल्या तिथी प्रमाणे ५ एप्रिल रोजी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला खरे पण कोरोना नियमांचा भंग करुन या लग्नात तब्बल तिनशेच्या वर वऱ्हाडी मंडळी जमल्याने वधूपित्याला दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले असून त्यांच्या कडून २० हजार दंड ठोठावण्यात आला आहे.


●औरंगाबाद : महापालिका हद्दीत मागील दीड महिन्यापासून दररोज एक ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ज्या भागातून सर्वाधिक रुग्ण येत आहेत त्या भागाला महापालिकेने कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर सर्वत्र टीका सुरू करण्यात आली. प्रशासनाने तातडीने स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांकडून झोन निश्चितीचे काम करून घेतले. शनिवारी सायंकाळी शहरात एकूण २६ कन्टेनमेंट झोन असल्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये तीन वेगवेगळ्या श्रेणीत या झोनची विभागणी करण्यात आली आहे.


●भंडारा : जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रविवारी नव्याने ८४४ रुग्णांची भर पडली. दोन दिवसातील हा आकडा सर्वाधिक आहे. कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. आता कोरोनाबळींची संख्या ३५२ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८६१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १५ हजार ५३० व्यक्ती कोरोनामुक्त झालेत, तर ४९७९ व्यक्ती उपचाराखाली आहेत. गत वीस दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.


●कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत जमावबंदी व शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा नियम ३० एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत लागू असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी हा आदेश जिल्ह्यासाठी लागू केला.


●नागपूर : दोन गटात वाद झाल्यानंतर १५ ते २० सशस्त्र गुंडांनी पाचपावलीतील प्रतिस्पर्ध्याच्या घराकडे धाव घेतली. तो घरी दिसला नाही म्हणून त्याच्या वस्तीतील १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. रविवारी रात्री ९.३० ला सुरू झालेली वाहनांच्या तोडफोडीची मालिका सुमारे अर्धा तास सुरू होती. गुंडांच्या हातातील तलवारी, रॉड, चाकू, लोखंडी सळ्या आणि दंडुके बघून त्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.


●पुणे : 'खासगी रुग्णालयातील नेमक्या खाटा पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत?, त्या खाटांवर पालिकेचे टॅग लावण्यात आलेले नाहीत. आम्हाला आयसीयू अथवा कोरोना कक्षात जाऊच दिले जात नाही. डॅशबोर्डवर काय माहिती अपलोड केली जाते हे सुद्धा पाहू दिले जात नाही. मग आम्ही खाटांचे व्यवस्थापन कसे करायचे?' ही उद्विग्नता सर्वसामान्य नागरिकांची नव्हे तर खुद्द पालिकेच्याच अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे डॅशबोर्डवर दर्शविली जाणारी माहिती खरी असते का याविषयी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.


●सोलापूर :  सोमवार ते शुक्रवारी  सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत बेकरी, दूध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकाने, खाद्यपदार्थ, मेडिकल यासारखे अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागात सर्व दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद राहतील.

तसेच शनिवारी-रविवारी पूर्णता बंद राहील. उर्वरित कालावधीमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि पुढे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वैद्य करण्याशिवाय किंवा परवानगीशिवाय संचार करण्यास बंदी राहील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section