वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे निवडणूक निकाल समोर आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष बनले आहेत. त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा एकदा अमेरिकेचं अध्यक्षपद मिळवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २७० चा बहुमताचा आकडा पार करत हा विजय मिळवला.
फॉक्स न्यूजनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. त्याचवेळी कमला हॅरिस यांना केवळ २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.
ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांना संबोधित केलं
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह त्यांच्या समर्थकांना संबोधित करायला पोहोचले. यावेळी ट्रम्प यांनी विजयाचा आनंद असल्याचं सांगितलं, तसेच त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील सर्वात मोठा राजकीय क्षण असल्याचे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या मतदारांना संबोधित करत म्हणाले, 'आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. आपल्या देशाने याआधी कधीही न पाहिलेला हा ऐतिहासिक राजकीय विजय आहे. ४७ वे राष्ट्रपती म्हणून मी तुमच्यासाठी रोज लढेन. हा अमेरिकेचा मोठा विजय आहे, ज्यामुळे अमेरिका पुन्हा महान होईल. आपण जेशाच्या सीमा अधिक मजबूत करु आणि देशातील सर्व प्रश्न सोडवू'.
मी तुमच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी लढणार असल्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी नागिरिकांना दिलं. आम्हाला स्विंग राज्यातील मतदारांचाही पाठिंबा मिळाला. पुढील चार वर्ष अमेरिकेसाठी सोनेरी असणार आहेत. जनतेने आम्हाला भक्कम जनादेश दिला आहे, असं म्हणत ट्रम्प यांनी जनतेचे आभार मानले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जेडी वान्स यांनीही रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांना संबोधित केले. जेडी वन्स म्हणाले, 'हे अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठे राजकीय पुनरागमन आहे. मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे राजकीय पुनरागमन आहे'. जेडी वान्स यांनीही त्यांच्या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.