बारामती : बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार गटातील सर्व नेत्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली. बारामतीमध्ये या मेळाव्यातून अजित पवार यांनी शक्तीप्रदर्शन केले. विधानसभा निवडणूकीपूर्वी अजित पवार यांचा हा महत्त्वाचा मेळावा मानला जात आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट केले. तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील भूमिका मांडली.
काय म्हणाले छगन भुजबळ?
मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये ऐरणीवर असल्यामुळे सरकारने आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधी गटातील तिन्ही पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातल्यामुळे सत्ताधारी संतापले. मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीवरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ म्हणाले, “काही लोकांचा विचार आहे की, आपापसात दंगे व्हावे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण आमचं म्हणणं आहे की, ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना त्रास होऊ नये. आरक्षणावरुन सुरु असलेलं भांडण मिटावे म्हणून सह्याद्री अतिथीगृह येथे एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं की, तुम्ही पण या. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोललो होतो. त्यांना सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना सुद्धा बोलवा. एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार तिथे यायला पाहिजे होते”, अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
बारामतीतून 5 वाजता फोन करण्यात आला
पुढे त्यांनी राजकीय गौप्यस्फोट केला. छगन भुजबळ म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीला सगळे येणार होते. पण संध्याकाळी बारामतीमधून एक फोन गेला आणि त्या सगळ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तुमचा राग अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर असेल पण हे मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाही? महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत. निवडणुकीच्या वेळेस तुम्ही तुमचे झेंडे घ्या. आम्ही आमचे घेऊ. पण अशा मुद्द्यांवर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे बरोबर नाही. शरद पवारांचा माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावरील राग समजू शकतो. पण मराठा आणि ओबीसी समजांनी तर खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान केलं. पवारांनी बैठकीला यायला पाहिजे होतं. बारामतीतून सर्वपक्षीय बैठकीला जावू नये म्हणून 5 वाजता फोन करण्यात आला होता” असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभेत होतं ते विधानसभामध्ये होतंच असे नाही
छगन भुजबळ पुढे म्हणाले, पावसाळी अधिवेशन संपले आहे. यावेळी अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल, विद्यार्थी योजना, शेतकरी सन्मान योजना या योजना जाहीर करण्यात आली आहे. ही सर्व कामे जनतेपर्यत पोहोचण्यासाठी हा जनशक्ती मेळावा आहे. याची सुरुवात बारामतीपासून करत आहोत. विधान परिषद निवड झाली त्यात सांगितले गेले की, आमची मते फुटतील पण कुणाची मते फुटली हे बघितले. लोकसभेवेळी खोटा प्रचार केला गेला. मात्र लोकसभेत होतं ते विधानसभामध्ये होतंच असे नाही, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहेत. त्यावर भुजबळ म्हणाले, जरांगे उपोषणाला बसत आहेत. लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.