पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा खास : 26 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. यावेळी भारताचे 120 खेळाडू जाणार आहेत. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 10000 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला खास बनवण्यासाठी पॅरिसने गेल्या 10 वर्षांपासून अनेक विशेष तयारी केली आहे. येथे आम्ही तुम्हाला 2024 च्या ऑलिम्पिकची वैशिष्ट्ये सांगणार आहोत. ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा कुठे होणार आहे, त्याचबरोबर यंदाच्या ऑलिम्पिकच्या मेडलमध्ये काय विशेष आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे खेळ पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार
असे अनेक खेळ आहेत जे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही खेळ या ऑलिम्पिकचा भाग नसणार आहेत. यामध्ये कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे खेळ टोकियो ऑलिम्पिकचा भाग होते, पण यावेळी ते काढून टाकण्यात आले आहेत. ज्या नवीन खेळाडूंचा आज समावेश करण्यात आला आहे त्यासाठी भारताचा एकही खेळाडू पात्र ठरलेला नाही. भारताचे १२० खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समवेश आहे.
असा होणार ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा
यंदाचे ऑलिम्पिकचे यजमानपद पॅरिसकडे सोपवण्यात आले आहे, त्यामुळे यावेळी ऑलिम्पिकचा हा सोहळादेखील मोठ्या थाटात होणार आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची खास तयारी करण्यात आली आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकचा उद्घाटन सेरी नदीवर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खेळाडू बोटीने त्यांच्या देशाचे झेंडे घेऊन आयफेल टॉवरच्या दिशेने जाणार आहेत. याआधी झालेले सोहळे हे मोठ्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते, पहिल्यांदाच हा सोहळा नदीवर होणार आहे.
यंदाचे ऑलिम्पिक पदक खास
पॅरिस ऑलिम्पिकचे यंदाचे जे पदक असणार आहे त्याचे सुद्धा वैशिष्ठ आहे. पदकाची रचना केवळ विलक्षणच नाही तर प्रत्येक पदकावर आयफेल टॉवरही कोरलेला आहे. पदकाच्या रचनेत फ्रान्सचा आत्मा दिसून येईल. प्रत्येक पदकाला आयफेल टॉवरचे मूळ लोखंड जोडलेले आहे.