Chandrayaan 3 Successful Landing : पुढचे १४ दिवस रोव्हर काय काय माहिती पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Chandrayaan 3 Successful Landing : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्रोची ही मोहीम यशस्वी झाल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या प्रचंड मेहनीचं फळ काल त्यांना मिळालं आणि देशासाठी ही गौरवास्पद बाब ठरली. चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग झालं त्यानंतर २ तास २६ मिनिटांनी रोव्हर लँडरमधून बाहेर आलं.
रोव्हरला सहा चाकं आहेत आणि त्यावर अशोक स्तंभाची खूण
चांद्रयान ३ चं विक्रम लँडर हे बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. त्यानंतर २ तास २६ मिनिटांनी प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर आलं. रोव्हर म्हणजे सहा चाकं असणारा रोबोट आहे. हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालला की तिथल्या पृष्ठभागावर अशोक स्तंभ आणि इस्रोच्या खुणा उमटणार आहेत कारण या रोव्हरच्या चाकांवर अशोक स्तंभ आणि इस्रोचं चिन्ह कोरण्यात आलं आहे.
चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर जी धूळ उडाली ती खाली बसण्यास २ तासांपेक्षा जास्त कालावधी गेला. धूळ खाली बसण्याआधी रोव्हर बाहेर आलं असतं तर त्याच्यावर असलेल्या कॅमेरांवर धूळ बसली असती तसंच आतील उपकरणाचं नुकसान होऊ शकलं असतं. त्यामुळेच रोव्हर २ तास २६ मिनिटांनी बाहेर आलं. चांद्रयान १ या मोहिमेच्या वेळी चंद्रावर पाण्याचे अंश आढळले आहेत. आता रोव्हर प्रज्ञान याविषयी काय काय माहिती पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचं आयुष्य १४ दिवसांचं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे काम करणार आहेत. या दोहोंवर चार मशीन्स आहेत. एनडीटीव्हीने रोव्हर लँडरच्या बाहेर आल्याचं वृत्त दिलं आहे.
१४ दिवसांची मोहीम
ISRO ने दिलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरमधून रोव्हर बाहेर आल्यानंतर आता तो पुढचे १४ दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वाटचाल करणार आहे. या दरम्यान जेव्हा उन असेलल तेव्हा रोव्हरला सौर उर्जा मिळणार आहे. १४ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधार होईल ज्यानंतर लँडर आणि रोव्हर दोघांचंही काम थांबेल.