गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. भारताचं हे चांद्रयान आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केलं. अलिकडेच रशियाने लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली. त्यापाठोपाठ भारताची चांद्रयान मोहीम सुरू होती. भारताच्या मोहिमेबद्दल लोकांच्या मनात धाकधूक होती. परंतु, ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं होतं. भारताचे शास्त्रज्ञ त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरले आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे.
अनेक अडथळे पार करत भारत आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भारतवासियांना संदेश देताना म्हणाले, “We Are on the Moon” (आपण आता चंद्रावर आहोत.)
चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगनंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेशी जोडलं गेलं होतं.