सध्याच्या ५ जी तंत्रज्ञानावर आधारितच ६ जी तंत्रज्ञान येणार आहे. मात्र, ६ जी हे ५ जी नेटवर्कच्या तुलनेत अनेक अंगांनी सरस असणार आहे.
सध्या भारतात ५ जी सेवा सुरू झाली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांत ही सेवा कार्यान्वित करण्यात आली असून कोट्यावधी लोक हायस्पीड इंटरनेट वापरत आहेत. ५ जी सेवा संपूर्ण भारतभर पोहोचलेली नाही. असे असतानाच आता अनेकांना ६ जी नेटवर्कचे वेध लागले आहेत. ६ जी नेटवर्कवर सध्या काम सुरू असून आगामी काही वर्षांत ही सेवा लोकांना प्रत्यक्षात वापरता येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे सूतोवाच केले आहे. याच पार्श्वभूमीवर देशात ६ जी सेवा कधी येणार? ही सेवा प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यास काय फायदा होणार? सध्या देशातील ५ जी सेवेची काय स्थिती आहे? हे जाणून घेऊ या…
नरेंद्र मोदी भाषणात काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात इंटरनेटच्या ६ जी सेवेचा उल्लेख केला. भाषणात बोलताना “आम्ही एका ६ जी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आपण देशात सर्वाधिक वेगाने ५ जी सेवा दिलेली आहे. सध्या साधारण ७०० जिल्ह्यांत ५ जी सेवा सुरू आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आपण लवकरच सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ, असे भाकीतही केले.
६ जी म्हणजे काय?
६ जी हे सिक्स्थ जनरेशन सेल्यूलार तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने मायक्रो सेकंदाच्या वेगाने कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ४ जी, ५ जी तंत्रज्ञानाच्या पुढील तंत्रज्ञान म्हणजेच ६ जी तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानात हायर फ्रिक्वेन्सी बँड्सची मदत घेण्यात येते. ६ जी एक क्लाऊड बेस नेटवर्किंग टेक्नॉलॉजी असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंटरनेटचा वेग कित्येक पटीने वाढणार आहे.