पंजाब डख : हवामान अंदाजासाठी चर्चेत असणारी व्यक्ती, पण त्यांचे अंदाज किती खरे?
Type Here to Get Search Results !

पंजाब डख : हवामान अंदाजासाठी चर्चेत असणारी व्यक्ती, पण त्यांचे अंदाज किती खरे?

Top Post Ad


हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा माझ्या गावात सिनगांव जहांगीरला (बुलडाणा) काही दिवसांपूर्वी कार्यक्रम झाला.

यावेळी हवामान अंदाज व्यक्त करताना पंजाब डख म्हणाले, “तुमच्या पंचक्रोशीत 10 जून रोजी खूप पाऊस पडणार आहे. 10,11,12 जूनला तुमच्या इथं गुडघ्याइतकं पाणी साचलेलं राहील. 10 जून नंतर तुमच्या परिसरात खूप पाऊस पडणार आहे. 10 ते 14 जून पर्यंत तुमच्या गावात खूप पाऊस पडणार आहे.”

पंजाब डख यांचा हा हवामान अंदाज खोटा ठरला आहे. 17 जून तारीख आली असून आजपर्यंत माझ्या गावात पावसाचा एक थेंबही पडलेला नाहीये.

याआधी पंजाब डख यांनी अंदाज वर्तवला होता की, राज्यात 8 जूनपासून पावसाला सुरवात होईल.

त्यांचा हा अंदाज ऐकून गावातील शेतकरी सूर्यकांत खरात यांनी पेरणी केली.

पंजाब डख यांच्या अंदाजाविषयी विचारल्यावर सूर्यकांत सांगतात, "पंजाब डख यांनी सांगितलं होतं की, 9-10 तारखेपासून चांगला पाऊस येणार आहे. म्हणून मग मी 8 तारखेला सरकी लावली. आता 10 दिवस झाले तरी पाऊस नाही. यंदा पंजाब डख यांचा अंदाज फेल झालाय."

गावात पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध असल्यानं सूर्यकांत सध्या सरकीला पाणी देत आहेत.

ते सांगतात, “ज्याच्याकडे पाणी नाही त्यांचं बियाणं खराबच होणार आहे. माझ्याकडे पर्याय होता पाण्याचा म्हणून मोटार सुरू केली. रात्रभर उभं राहून सरकी भरली. नसती भरली तर साडे सात हजाराचं बियाणं खराब झालं असतं. कारण तापमान खूप आहे.”

गेल्या वर्षी पंजाब डख यांच्या हवामान अंदाजाचा फायदा झाल्याचंही सूर्यकांत सांगतात.

“मी मागच्या वर्षी पंजाब डख यांच्या भरवशावर सोयाबीन काढली. आता उन्हाळी मकाही काढली. तिथंपर्यंत त्यांचे अंदाज खरे ठरले. आता मात्र अंदाज चुकत आहेत.”

पंजाब डख यांचं म्हणणं काय?

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला पंजाब डख हे नाव माहिती नसेल, असं क्वचितच घडेल.

हवामान अभ्यासक पंजाब डख आणि त्यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज याची गावागावात चर्चा होताना दिसून येते. त्यांचे अंदाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येतात.

पण पंजाब डख यांचा अंदाज चुकत आहे, असं शेतकरी म्हणत आहेत. यावर डख यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला.

ते म्हणाले, “पावसाचा अंदाज चुकला नाही. चक्रीवादळ आलं आणि ते बाष्प घेऊन गेलं. जर का ते चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकलं असतं तर महाराष्ट्रात पाऊस झाला असता.”

तुमचा अंदाज ऐकून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांचं काय, असा प्रश्न विचारल्यावर डख म्हणाले, “शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वत: घ्यावा असं मी नेहमी सांगत असतो. जमिनीत 1 इंच ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.”

पंजाब डख यांना सोशल मीडियावरही ट्रोल केलं जात आहे. गावागावांत आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी व्यक्त केलेले अंदाज चुकीचे ठरल्याचं बोललं जात आहे. तर काही जण त्यांच्या बाजूनंही बोलत आहेत.

याविषयी विचारल्यावर डख म्हणाले, “100-200 लोक माझ्याविरोधात बोलतात. ते जाणून-बुजून मला विरोध करतात. बाकी बहुसंख्य शेतकरी माझ्या पाठीशी आहेत.”

पंजाब डख कोण आहेत?

पंजाब डख यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या परभणी जिल्ह्यातल्या गुगळी धामनगाव (26 ऑगस्ट 2021) या गावात गेलो होतो.

दुपारी कुठेतरी मार्गदर्शन करण्यासाठी जायचं असल्यामुळे त्यांनी आम्हाला सकाळीच 8 वाजता बोलावलं होतं.

तुमच्याविषयीची वैयक्तिक माहिती सांगा असं विचारल्यार ते म्हणाले, "माझं बीए झालेलं आहे. सीटीसीए आहे आणि एटीडी आहे. मी गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक म्हणून 2012 साली लागलो होतो. पण, 2017 च्या नंतर त्याला कोर्टानं स्टे दिला. त्यामुळे सगळे 18 हजार शिक्षक आता रिक्त पदावर आहेत."

शेतीविषयी विचारल्यावर ते म्हणाले, "माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. 1995 पासून माझा हवामानावर अभ्यास आहे. त्यामुळे मी निर्सगावर, हवामानावर आधारित शेती करतो. मी सोयाबीन आणि हरभरा पिके घेतो. घरचंच बियाणं वापरतो. बिगर बैलाची, बिगर गड्याची, बिगर मजुराची शेती करतो."

हवामानाबद्दल नेमकं काय शिक्षण घेतलंय, या प्रश्नाचं उत्तर देताना डख म्हणाले, "मी आणि माझे वडील हिंदीमधील हवामानाच्या बातम्या पाहायचो. त्यात हवामानाचे अंदाज दाखवायचे. हिंदी आणि इंग्रजीत अंदाज सांगितला जायचा, पण तो राष्ट्रीय पातळीवर सांगितला जायचा. मग मी वडिलांना म्हणालो की महाराष्ट्रात 42 हजारांहून अधिक गावं आहेत. त्यामुळे मग राज्यात नेमका पाऊस कुठे आणि कधी पडेल हे कसं सांगायचं? त्यावेळेस मी आठवीला होतो.

"तेव्हापासूनच मला हवामानाचा छंद लागला. 2002 ला परभणीला जाऊन सीडॅक कॉम्प्युटरचा कोर्स केला. तिथं फक्त आणि फक्त उपग्रह बघण्यासाठी मी जात होतो. त्यानंतर निसर्गाच्या बारीक बारीक बदलांवर अभ्यास सुरू केला."

पावसाचा अंदाज कसा सांगता हा प्रश्न असं विचारल्यावर ते म्हणाले, "माझा उपग्रह आणि निसर्गावर अभ्यास आहे. माझं निरीक्षण खूप आहे. मी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करतो म्हणून मला केवळ पाण्याचे ढग दिसतात. माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जे बघतो ते शेतकऱ्यांच्या भल्याच्या दृष्टिकोनातून बघतो."

पण, पावसाचा अंदाज सांगण्याचं तुमचं तंत्र काय आहे, असं विचारल्यावर डख म्हणाले, "माझा शास्त्रीय, नैसर्गिक आणि वातावरणाचा अभ्यास आहे. निसर्गात पाऊस येणार की नाही हे सांगणारे काही इंडिकेटर्स असतात. ते पाहून पाऊस येणार की नाही ते कळतं."

हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?

पंजाब डख यांच्या हवामानाच्या अंदाजाविषयी काय वाटतं, हे हवामान तज्ञांकडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता.

हवामान अभ्यासक उदय देवळाणकर यांनी म्हटलं होतं, "आपल्या देशात एकूण 36 हवामान विभाग आहेत. महाराष्ट्रात 4 हवामान विभाग आहेत. हवामान विभागाची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. हवामान विभाग हा विभागनिहाय अंदाज देत असतो. हवामान अंदाजाचा हा एक विश्वासार्ह स्रोत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता 85 ते 90% आहे. त्यामुळे इतरांच्या भोंदूपणावर विश्वास ठेवू नये."

"हवामान विभाग दर 15 दिवसांचा अंदाज देत असतं आणि दररोज यासंदर्भातले नकाशे प्रकाशित करत असतं. यात OLR मॅप जो मान्सूनच्या हालचाली दर्शवत असतो तसंच INSAT CCD (सॅटेलाईट मॅप) असतो. शेतकऱ्यांच्या मुलांनी हवामान विभागाचे हे अंदाज वाचायला शिकलं पाहिजे. याशिवाय जवळच्या हवामान केंद्रावरचा हवेचा दाब पाहिला पाहिजे," असं ते पुढे म्हणाले.

पंजाब डख यांचे गावोगावी सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत.

तर एका ज्येष्ठ हवामान तज्ञानं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं होतं, "हवामानाचा अंदाज सांगणं हे फार हुशार लोकांचं काम आहे. पण, हवामानाचं बेसिक ज्ञान नसताना हवामानाचे अंदाज कुणी सांगत असेल तर अवघड आहे. वारे, ढग, तापमान, आद्रर्तेबद्दलचे ज्ञान नसेल, कधी वेधशाळेत गेला नसेल आणि हवामानाचा अंदाज सांगत असेल तर हे खूप रिस्की काम आहे."

हवामानाचा अंदाज कुठे आणि कसा बघायचा?

भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा हवामानाच्या अंदाजाचा अधिकृत स्रोत समजला जातो. याशिवाय कृषी विद्यापीठांच्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. तिथेही हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात.

स्कायमेट ही हवामानाचा अंदाज देणारी खासगी संस्था आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी वर्तवलेल्या अंदाजाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.

भारतीय हवामान विभागाचा अंदाज बघण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

या वेबसाईटवर दिसत असलेल्या Warnings या भागात विशेष काही इशारा असेल, तर त्याची तारीख आणि जिल्हानिहाय तसंच विभागनिहाय माहिती दिलेली असते.

Our Services या रकान्यात Rainfall information या भागात तुम्ही तुमच्या राज्यातील तुमच्या जिल्ह्यात गेल्या काही तासांत किती पाऊस झाला, याची नोंद केलेली असते.

तर Monsoon या भागात मान्सून कुठपर्यंत पोहोचलाय, त्याची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता.

प्रातिनिधिक फोटो

Cyclone या भागात पुढच्या काही तासांमध्ये वादळाची शक्यता आहे, ते सांगितलेलं असतं.

याशिवाय भारतीय हवामान विभागाच्या यूट्यूब चॅनेलवर दररोज संध्याकाळी देशातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी माहिती दिली जाते. तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथं दिवसभरातील हवामान आणि पुढच्या काही तासांतील हवामानाचा अंदाज यांची माहिती सांगितली जाते. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत ही माहिती दिली जाते.

स्कायमेट या संस्थेच्या हवामानाचा अंदाज संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला असतो. इथं जाऊन तो पाहता येऊ शकतो.

या वेबसाईटवर हवामानासंबंधीच्या बातम्या हिंदी, इंग्रजी आणि मराठीत वाचायला मिळतात. हवामानाच्या अंदाजासंबंधीचे नकाशे आणि व्हीडिओही इथं पाहायला मिळतात.

  • श्रीकांत बंगाळे
  • Role,
    बीबीसी मराठी प्रतिनिधी

Below Post Ad