सूचना - याविषयी माहिती आपण दोन भागात पाहणार आहोत. यातील हा
भाग २ ...
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांना रोखण्यासाठी औरंगजेबाने सतत प्रयत्न केले. मोगलांनी मराठ्यांकडून कल्याण बंदर जिंकून घेतलं. कधी शाहिस्तेखानाला दक्षिणेत पाठवलं, मग शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला पळवून लावलं. शिवाजी महाराजांनी कारतलबखानाला उंबरखिंडीत पराभूत केलं, सूरतेची लूट केली अशा घडामोडी सुरू राहिल्या. 1665मध्ये मिर्झाराजे जयसिंहांनी पुरंदरला वेढा दिला आणि शिवाजी महाराजांना तह करावा लागला. यात त्यांना आपल्या स्वराज्यातले 23 किल्ले द्यावे लागले. तसेच पुढच्या वर्षी त्यांना आग्र्यालाही जावे लागले.
आग्रा येथे शिवाजी महाराजांना कैदेत टाकल्यानंतर अत्यंत चातुर्याने महाराजांनी सुटका करून घेतली.
परत आल्यावर शिवाजी महाराजांनी एकेक किल्ले आणि जवळचे खानदेश, वऱ्हाड हे प्रांत लुटले. किल्ले जिंकले, पुढे 1674 साली राज्याभिषेकही करवून घेतला. मग इतर प्रदेशही त्यांनी जिंकून घेतले 1680 साली शिवाजी महाराजांचे निधन झाले.
छ. संभाजी महाराज आणि पुढे
1681 साली औरंगजेबाचा पुत्र अकबराने स्वतःला राज्याभिषेक करुन बंड केले मात्र ते अपयशी ठरल्यामुळे त्याला महाराष्ट्रात यावं लागलं. मग औरंगजेबानेच पुन्हा दख्खनमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 1682 साली तो औरंगाबादला आला. मुघलांनी गोवळकोंडा, हैदराबाद, माळवा, विजापूर असे एकेक प्रांत जिंकून घेतले. राजपुत्र अकबराने इराणला पलायन केलं.
1689 साली औरंगजेबानं छ. संभाजी महाराजांना कैद करुन त्यांना हालहाल करुन क्रूरपणे त्यांचा शिरच्छेद केला. महाराणी येसुबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना कैद केलं. त्यानंतर महाराष्ट्रातले किल्ले तसेच दक्षिणेतील प्रदेश जिंकायला सुरुवात केली.
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याची सूत्रं घेतली. त्यांच्याशीही संघर्ष सुरूच राहिला. हा सततचा संघर्ष किल्ले घेणं, गमावणं, प्रदेश गमावणं, लूट करणं किंवा आपल्या संपत्तीची लूट होणं हा क्रम औरंगजेबाच्या अखेरपर्यंत सुरू राहिला.
अंतकाळ आणि एकाकी शेवट
औरंगजेब बादशहा असला तरी त्याच्या आयुष्याचंं शेवटचं दशक फक्त दुःखानंच भरून गेलं होतं. एकाकी आणि हतबल अवस्थेकडे त्याची वाटचाल होत गेली. इतर बादशहांच्या तुलनेत दीर्घायुष्य मिळालं असलं तरी तेवढीच जास्त दुःखं त्याच्या वाट्याला आली.
त्याच्या मुलाचा अकबराचा इराणमध्ये मृत्यू झाला. आवडती सून 1705 साली मृत्युमुखी पडली. मुलगी झेबुन्निसाने आत्महत्या केली. त्याची बहीण गौहरआराही 1706 साली निधन पावली. 1706 साली त्याची दुसरी मुलगी मेहरुन्निसा व जावई वारले. मग त्याचा नातूही वारला. 1707मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस त्याचे 2 नातू वारले. असं दुःख, एकटेपण, वैफल्य यांना कवटाळून त्याला मृत्यू पत्करावा लागला.
मृत्यू दख्खनमध्येच
औरंगजेबाचा अहमदनगरजवळ भिंगार येथे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला.
कारण, मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं.
याविषयी इतिहासकार डॉ. दुलारी कुरैशी सांगतात, "औरंगजेबानं इच्छापत्र लिहिलं होतं. त्यात त्याने अगदी स्पष्ट लिहिलं होतं की, माझे गुरू हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांना तो आपले गुरु मानायचा. झैनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे होते.
पण, औरंगजेब वाचन खूप करायचा. त्यात त्याने सिराजी यांना खूप फॉलो केलं. मग औरंगजेबानं सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्याजवळच बांधायची."
ही कबर कशी असावी, याविषयीही औरंगजेबानं मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं.
कुरैशी सांगतात, "माझी जी कबर बांधाल, ती मी जे पैसे स्वत: कमावले आहेत, त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावायचं. एवढीच औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या, तसंच तो कुराण शरीफ लिहायचा. त्यात जी कमाई झाली त्यातच त्याची खुलताबादेत कबर बांधण्यात आली."
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं ही कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं होतं. ते लाकडात बांधलेलं होतं.
त्यानंतर मग 1904-05 च्या दरम्यान लॉर्ड कर्झन आले. आणि त्यांना वाटलं की, इतका मोठा बादशाह आणि त्याची किती साधी कबर कशी काय असू शकते. त्यामुळे मग त्यांनी तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली.
औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे. तिच्यावर लिहिलं आहे की, औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहोम्मद औरंगजेब आलमगीर आहे. औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला....
मुघल बादशहांमधील एका शक्तीशाली बादशहाचं मन ज्या दख्खन एकाच शब्दानं आयुष्यभर भारुन गेलं होतं. त्या दख्खनमधून त्याला बाहेर पडताच आलं नाही. तो इथंच सुपुर्द ए खाक झाला....
source- BBC News
(या लेखासाठी रिबेल सुलतान- मनू एस. पिल्लै, इंडिया अंडर औरंगजेब- जदुनाथ सरकार, मोंगलमर्दिनी ताराबाई- रंगुबाईसाहेब जाधव, पुरंदरचा तह- डॉ. महेंद्र खडगवत या पुस्तकांचा उपयोग केला आहे. )