शेजारी सगळं सुरळीत सुरू असेल तर आपल्या घरात शांतता नांदते, पण शेजारी अशांतता व अनिश्चितता असेल तर आपल्या घरातील चिंताग्रस्तता वाढते, असं म्हटलं जातं.
पाकिस्तानातील राजकीय संकट व श्रीलंकेत निर्माण झालेलं भीषण आर्थिक संकट यांमुळे भारताने चिंतित व्हायला हवं का?
श्रीलंका व पाकिस्तान इथल्या संकटांचा भारतावर परिणाम होणं स्वाभाविक आहे, असं तज्ज्ञ म्हणतात.
श्रीलंकेतील संकट आणि भारत
श्रीलंकेत काही संकटकारक परिस्थिती उद्भवली किंवा हिंसाचार झाला की तिथले तामिळ लोक तामिळनाडूला स्थलांतरित होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव राहिला आहे.
श्रीलंकेत अनेक दशकं सुरू असलेल्या यादवी युद्धादरम्यान तिथले लाखो तामिळ भाषिक लोक भारताच्या आश्रयाला आले होते.
सध्या श्रीलंकेत प्रचंड गंभीर आर्थिक संकट निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथले तामिळ नागरिक पुन्हा एकदा भारताच्या दिशेने स्थलांतर करत आहेत.
तामिळनाडूच्या चिंतांमध्ये वाढ
हा प्रश्न तामिळनाडूसाठी चिंतेचा आहे. 22 मार्च रोजी रामेश्वरमच्या किनाऱ्यावर दोन गटांमध्ये आलेले 16 श्रीलंकन तामिळ हा याचा एक दाखला होता.
अलीकडच्या काळात श्रीलंकेतून येणाऱ्या तामिळींच्या आकडेवारीविषयी भारत सरकारने अजून काही अधिकृत माहिती दिलेली नाही.
पण सरकारी सूत्रांनी दिलेल्या अंदाजानुसार, श्रीलंकेतील बिकट परिस्थितीमुळे भारताच्या आश्रयाला येणाऱ्या तामिळ लोकांची संख्या आगामी काळात वाढेल.
श्रीलंकेत परकीय चलनाचा खडखडाट आहे. त्यांना 51 अब्ज डॉलरांच्या परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी बरीच खटपट करावी लागते आहे.
लोकांचं कंबरडं मोडणारी महागाई आणि सतत खंडित होणारा वीजपुरवठा यांसोबतच श्रीलंकेत अन्नपदार्थ, इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे.
या अस्थिर परिस्थितीत लोक मोठ्या प्रमाणात निदर्शनं करत रस्त्यावर उतरले असून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी देशात आणीबाणी लागू केली.