👑 राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल विस्तृतपणे माहिती...
💁♂️ महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे नेहमी म्हटल्या जाते. त्याचे कारण असे की महाराष्ट्रात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी समाजाच्या विकासासाठी आपले जीवन अर्पण केले. राजर्षी शाहू महाराज हे त्यांच्यापैकीच एक महानसमाज सुधारक होते. आज या आपण राजर्षी शाहू महाराज यांची माहिती जाणून घेऊत.
⭕ राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन परिचय : राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. त्यांचा जन्म २६ जून १८७४ ला कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कागल या गावी झाला. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेबांनी १८८४ मध्ये यशवंतराव यांना दत्तक घेतले. यशवंतराव यांचे नामकरण शाहू असे केले.
⭕ राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य
★ ब्राम्हणेतर चळवळ : शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर संस्थानात ब्राम्हणेतर चळवळ सुरू झाली. कोल्हापुरातील ब्राम्हण वर्गाने शाहू महाराजांना वेदोक्त विधी पार पाडण्याचा अधिकार नाकारला. मराठा समाजातील तरुणांना वैदिक विधी पार पाडण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष पुरोहित शाळा स्थापन केली. ब्राम्हण वर्गाच्या विरोधात ब्राम्हणेतर लोक एकत्र आले आणि त्यांचे नेतृत्व शाहू महाराजांनी केले.
★ कुलकर्णी वतनाचे निर्मूलन : गावकारभार पाहण्याची जबाबदारी ही कुलकर्णी या वतन दारावर असे. कुलकर्णी हे पद आनुवंशिक तत्वानुसार भरले जात असे. बऱ्याचदा वारसाहक्काने अयोग्य व्यक्ती कुलकर्णी बनत असे. तसेच कुलकर्णी हे वतनदारी ग्रामीण समाजाच्या विकासातील अडथळा आहे शाहू महाराजांच्या लक्षात आले. त्यामुळे वंशपरंपरेने भरले जाणारे कुलकर्णी पद रद्द करून त्याच्या ऐवजी तलाठी पद्धती सुरू करण्याचा आदेश त्यांनी १९१८ ला काढला. अशा प्रकारे कुलकर्णी वतनदारी पद्धत रद्द करून त्यांनी कनिष्ठ जातीतील लोकांना तलाठी पदावर नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा केला.
★ कनिष्ठ जातींच्या उन्नतीसाठी प्रयत्न : शाहू महाराज खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला पुढे आणणारे समाजसेवक होते. त्यांनी कनिष्ठ जातीतील लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले.
★ अस्पृश्यता निवारण : शाहू महाराजांनी कनिष्ठ जातींवरील हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी काही ठोस उपक्रम सुरू केले. त्यांनी १९०८ मध्ये कनिष्ठ जातींना शिक्षण देण्यासाठी एक संस्था स्थापन केली. कनिष्ठ जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि त्यांना शिष्यवृत्ती देणे सुरू केले. त्यांनी कोल्हापूर संस्थानात जातीच्या आधारे विद्यार्थ्यांचे विभाजन करण्यास बंदी घातली. त्याचप्रमाणे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या असलेल्या शाळाही बंद केल्या. कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यता पालनास बंदी घातली. त्यांनी सार्वजनिक ठिकाणे जसे नळ, विहिरी, धर्मशाळा आणि दवाखाने अस्पृश्यांसाठी खुले केले. तसेच स्वतच्या आचरणातून त्यांनी जातीभेद न पाळण्याचा आदर्श घालून दिला.
★ सत्यशोधक समाज आणि आर्य समाज यांचा वारसा चालविला : म. फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य मंदावले होते. शाहू महाराजांनी १९११ मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन केले. तसेच सत्यशोधक समाजाची धुरा पण सांभाळली.सत्यशोधक समाजाच्या विविध कार्यांना प्रोत्साहन तर दिलेच शिवाय आर्थिक मदत ही केली. १९१३ मध्ये त्यांनी सत्यशोधक विद्यालय स्थापन करून एका ब्राम्हणेतर व्यक्तीस शिक्षक म्हणून नेमले.
★ लोकशाहीचे समर्थक : शाहू महाराज लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. १९१९ मध्ये त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेचे प्रशासन हे जनतेमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे सोपविले. त्यामध्ये काही मागासवर्गीय उमेदवारही निवडून आले होते. शाहू महाराजांना सर्व जातीतील सुशिक्षित लोकांच्या हाती सत्ता असावी असे वाटत होते.
★ कृषीविषयक सुधारणा : शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक होते. त्यासाठी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञान मिळण्यासाठी त्यांनी १९१२ मध्ये किंग एडवर्ड कृषी संस्था स्थापन केली.त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेड्यापाड्यात कृषीविषयक यात्रा आणि प्रदर्शने भरवली.
थोडक्यात शाहू महाराज हे एक द्रष्टा महापुरुष होते.
★ शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य : केवळ शिक्षणामुळे कनिष्ठ जातींच्या लोकांचा विकास झाला नाही याची खात्री शाहू महाराजांना झाली होती. म्हणून त्यांनी कनिष्ठ जातीतील लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले.
★ मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण : शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १९१३ मध्ये कोल्हापूर संस्थानात प्रत्येक खेड्यात शाळा असावी असा आदेश काढला. पुढे १९१८ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा आदेश काढला. शैक्षणिक कार्यास मदत म्हणून सधन नागरिकांकडून कर गोळा केला. बहुसंख्याक असलेल्या जातीतील व्यक्तींना शिक्षक म्हणून नेमले. गावातील मंदिरे, चावड्या ह्या शाळेचे वर्ग म्हणून वापरण्यास परवानगी दिली.
★ शिष्यवृत्ती आणि वसतिगृहे सुरू केली : शाहू महाराजांनी १८९१-९२ मध्ये राजाराम महाविद्यालयामध्ये एक वसतिगृह सुरू केले. तसेच १९०१ साली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले.उच्च शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती देणे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षण शुल्क माफ केले. १९०८ मध्ये अस्पृश्य जातीच्या उन्नतीचे पुरस्कर्ते असलेल्या व्हाईलेट क्लार्क यांच्या नावाने अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर,नाशिक पुणे आणि अहमदनगर इत्यादी ठिकाणी सुमारे २६ वसतिगृहे सुरू केली.
🏨 शाहू महाराजांनी शालेय शिक्षण देणाऱ्या शाळांच्या व्यतिरिक्त समजोपयोगी कार्यांचे शिक्षण देणाऱ्या विविध शाळा सुरू केल्या.
त्या शाळा पुढीलप्रमाणे होत्या.
• श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक शाळा
• कुलकर्णी व पाटील शाळा
• औद्योगिक शाळा
• सैनिक शाळा
• संस्कृत शाळा
• सत्यशोधक शाळा
• युवराज शाळा
या शाळांमध्ये तांत्रिक, व्यावसायिक आणि धार्मिक शिक्षण भेटत असे.
👌 राजर्षी शाहू महाराज यांनी आपले जीवन बहुजन समाजातील लोकांच्या विकासाकरिता व्यतीत केले. हाती असलेल्या अधिकारांचा उपयोग करून शाहू महाराजांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. त्यातूनच कल्याणकारी राज्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. भारताचे संविधान लिहिताना त्यांच्या सुधारणा आणि कार्ये विचारात घेतली गेली. जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि आरक्षण.