जयपूरः देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये लसींची पुरेशी उपलब्धता नसल्याने अपेक्षित संख्येत लसीकरण होत नाहीए. बहुतेक राज्यांमधील अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. तर लसीकरण सुरू आहे तिथे गर्दी होताना दिसतेय. देशात लसींचा तुटवडा असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील ८ जिल्ह्यातील ३५ लसीकरण केंद्रांवर लसीचे ५०० व्हायल्स म्हणजे कुपी कचऱ्याच्या डब्यात आढळून आल्या आहेत. या ५०० व्हायल्समध्ये २५०० हजार डोस होते. लसीकरण केंद्रांवरील कचऱ्याच्या डब्यांमध्ये आढळून आलेल्या ५०० व्हायल्स या २० ते ७५ टक्के भरलेल्या आढळून आल्या. हे वृत्त दैनिक भास्करने दिलं ( vaccination in rajasthan ) आहे. राजस्थानमध्ये १६ जानेवारी ते १७ पर्यंत ११.५० लाखांहून अधिक करोनावरील डोस फेकण्यात गेल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. लसीचे डोस वाया जाण्याच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारचे आकडे वेगवेगळे आहेत. राज्यात लसीचे वाया जाण्याचे प्रमाण हे फक्त २ टक्के आहे, असा राजस्थान सरकारचा दावा आहे. तर एप्रिलमध्ये ७ टक्के आणि २६ मे महिन्यात ३ टक्के लसींचे डोस फेकण्यात गेल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. ज्या लसीकरण केंद्रावर तपासणी करण्यात आली तिथे २५ टक्के लसींचा अपव्याय समोर आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राजस्थानच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव अखिल अरोरा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.