■News Updates■
●मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात 47 हजार 827 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.
●अमरावती : खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा सुधारित करण्यात आले असून, आता कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपिड अँटिजेन अँटिबॉडीज तपासणीचे दरदेखील कमी करण्यात आले असून, अँटिजेन टेस्ट १५० रुपये करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेने याहून अधिक दर आकारल्यास साथरोग प्रतिबंध कायदा व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.
●चोपडा : खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला. हे व्हेंटिलेटर दोन दिवसात परत आणण्याच्या सक्त सूचना खासदारांनी जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली. चोपडयातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रश्न भाजप व शिवसेना आमने- सामने आल्याचे पहायला मिळाले.
●नाशिक : ऑक्सिजन बेडसाठी थेट महापालिकेत आलेेल्या कोरोना बाधित रुग्णाला बुधवारी तातडीने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
कोरोना रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी आणलेल्या दीपक डोके या कार्यकर्त्यावर पोलिसांनी साथ रोग प्रतिबंधक कायदा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सिडकोतील एका बाधिताला महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन, न्यू बिटको तसेच डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यामुळे त्यास डोके याने थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणले होते. आणखी एक बाधितही महापालिकेसमोर आला होता.
●म्हैसाळ : सांगलीच्या बिबट्यापाठोपाठ आता म्हैसाळमध्ये जंगली गवा रेड्याने एन्ट्री केल्याने एकच खळबळ उडाली.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ढवळी रस्ता या भागातील शेतात जंगली गवा रेडा दिसल्याने शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सकाळी म्हैसाळ ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज शिदे -म्हैसाळकर हे ढवळी रस्ताकडे गेले असता.त्यांना गवा रेडा दिसला.त्यानंतर त्यांनी वनविभाकडे यांची माहिती दिली.
●सांगली : सांगली जिल्ह्यात 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींची लसीकरणाची प्रक्रिया दि. 1 एप्रिल 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
●अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, १ एप्रिल रोजी आणखी पाज जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७०, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ८८ अशा एकूण २५८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २७,९५८ वर पोहोचला आहे.
●औरंगाबाद : शहरात १० हजार ९१५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये घरी थांबलेले आहेत. शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये ५० टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असतानाही शहरात सध्या कोठेही गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. शहरात उपचार घेण्यासाठी मराठवाड्यासह खान्देश आणि नाशिकपर्यंतचे रुग्ण येत आहेत. इतर जिल्ह्यांतील रुग्णांची माहिती खासगी रुग्णालये महापालिकेला देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
●भंडारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन आता अडीच महिने झाले असून, या कालावधीत एक लाख २२ हजार ८९७ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. त्यातील १० हजार ४१२ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यात १६८ केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू असून, मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध आहेत.
●पारध (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद केली आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत
●कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महसुल वसुलीला कोरोनाचा फटका बसला आहे. वार्षिक महसूलीमध्ये तब्बल ३२ टक्के घट झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे ही घट आली आहे.
●नागपूर : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात महामार्ग बांधकामात जागतिक विक्रम केला आहे. मार्च २०२१ च्या अखेरपर्यंत महामार्ग मंत्रालयाने एका दिवसात ३७ किमी या गतीने महामार्ग बांधकाम केले आहे. जगात सर्वाधिक गतीने महामार्गाचे बांधकाम करणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत देशभरात राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. गेल्या सात वर्षांत राष्ट्रीय महामार्गाची लांबी ५० टक्क्याने वाढली आहे.
●पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी 9 हजारांवर नवे कोरोनाबाधित आढळले आहे.तर जवळपास ६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली.पुणे शहरात शुक्रवारी ४ हजार ६५३ तर पिंपरीत २ हजार ४६३ रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ३ हजार ३३७ तर पिंपरीत १ हजार ५०७ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
●सोलापूर - प्रतिवर्षीप्रमाणे रूढी व परंपरेनुसार मंदिरातील नित्योपचार व सण उत्सव खंड न पडता, शुक्रवारी पंढरपुरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने रंगपंचमीनिमित्त कलगीची साध्या पध्दतीने मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान, कलगीवाले यांचे मठामध्ये जावून पुजा करून मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी डफाची मिरवणुक काळा मारूती चौफाळा-पश्चिमव्दार- संत नामदेव पायरी अशा मार्गाने आण्यात आली तसेच मंदिर समितीतर्फे श्री. रूक्मिणी मातेच्या डफाची पुजा करण्यात आली.