१०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे निर्देश दिल्यानं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य एका अधिकाऱ्याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. मात्र, सचिन वाझे प्रकरणात बदलीची कारवाई झाल्यानं आकसातून सिंग यांनी हे आरोप केल्याची भूमिका सरकारनं घेतली होती. तसंच, सिंग यांनी दबावाखाली येऊन हे आरोप केल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, देशमुख यांच्यावर आपण केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने आज सीबीआय चौकशीचे निर्देश दिले. 'हे अभूतपूर्व प्रकरण आहे. खुद्द मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत,' असं न्यायालयानं नमूद केलं होतं.
>> न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा व घराण्याचा मान राखत कारवाई करावी, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.