चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत
- भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या आघाडीच्या जोडीने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयला मात्र पराभव पत्करावा लागल्याने भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
- पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित सात्त्विक-चिराग जोडीने आक्रमक खेळ करताना इंडोनेशियाच्या १३व्या मानांकित लिओ रॉली कार्नाडो-डॅनिएल मार्टिन जोडीचा २१-१६, २१-१४ असा पराभव केला. भारतीय जोडीने या वर्षी इंडोनेशिया, कोरिया आणि स्विस स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.
- आता उपांत्य फेरीत भारतीय जोडीसमोर चीनच्या हे जी टिंग-रेन शिआंग यू जोडीचे आव्हान असेल. टिंग-यू जोडीने आपल्याच देशाच्या आठव्या मानांकित लियू यू शेन-ओऊ शुआन यी जोडीला २१-१५, २१-१५ असे पराभूत केले.पुरुष एकेरीत भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. प्रणॉयला जपानच्या कोडाई नाराओकाकडून ९-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.
दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघ ओडिशात
- महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले होते. त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील वाघ तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ओडिशात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाघांचे स्थलांतरण, त्यांचा कॉरिडॉर आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
- ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील महेंद्र परिवनक्षेत्रात हा वाघ वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिसला. तो नवीन असल्याचे त्यांना जाणवल्याने त्यांनी वाघाची छायाचित्रे व इतर तपशील डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला पाठवले. संस्थेच्या वैज्ञानिकांनी ओडिशातील या वाघाच्या प्रतिमा इतर वाघांशी जुळवून पाहिल्या. त्यानंतर त्यांना हा वाघ महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील असल्याचे आढळले. या वाघाने दोन हजार किलोमीटरचा पल्ला गाठताना चार राज्ये पालथी घातली. तर या प्रवासादरम्यान त्याने नदीनाले, शेत, महामार्ग आदी पार केले. या भागात वाघ पहिल्यांदाच दिसल्याने, त्यांनी वाघाची छायाचित्रे आणि इतर तपशील भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठवून त्याचा मूळ प्रदेश शोधला.
- महाराष्ट्रात यापूर्वी ‘वॉकर’ नावाने प्रसिद्ध झालेल्या वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर गाठले. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरमधील हा वाघ नंतर ज्ञानगंगात स्थिरावला. मात्र, आता या वाघाचा काहीच थांगपत्ता नाही. दरम्यान, ओडिशात स्थलांतरित झालेल्या या वाघाबाबत ताडोबाचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर व ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.
- यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर कोंढाळी भागातील ‘नवाब’ वाघ अनुक्रमे १०० व १३० किमी प्रवास करून अमरावती जिल्ह्यातील पोहरा मालखेड राखीव जंगलात आला. उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘बली’ नावाच्या वाघाने सुमारे १५० किलोमीटरहून अधिक एरियल अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठले. नागझिरा अभयारण्यातील अल्फा, जय या वाघांनी देखील स्थलांतरण केले आहे.
दादर स्थानकात मध्य मार्गावरील फलाट क्रमांक बदलणार, गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या नवे बदल!
- मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक आता बदलणार आहेत. दादर स्थानकातून पश्चिम आणि मध्य मार्गावर लोकल धावते. दोन्ही मार्गांवरही समान फलाट क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ९ डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने २७ सप्टेंबर रोजी एक्स पोस्टद्वारे दिली होती. आता ९ डिसेंबरची तारीख जवळ आली असल्याने आयत्यावेळी गोंधळ उडण्याआधी तुम्ही दादर स्थानकावर झालेले बदल जाणून घ्या आणि सर्वांना शेअर केला.
- दादर स्थानकावर एकूण १५ फलाट आहेत. त्यापैकी ८ फलाट मध्य रेल्वे मार्गावर, तर ७ फलाट पश्चिम मार्गावर आहेत. दोन्ही मार्गांवर सारखेच क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. मुंबईत नव्याने आलेल्या प्रवाशांना दादर स्थानकातील मध्य आणि पश्चिम मार्गावरील फरक कळत नाही. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने फलाटांचे क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम मार्गावर १ ते ७ क्रमांक फलाट तसेच राहणार आहेत. तर, मध्य मार्गावरील १ ते ८ क्रमाकांच्या फलटांना ८ ते १४ असे क्रमांक देण्यात येणार आहेत.
- सध्या दादर स्थानकावर फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे फलाट क्रमांक दोन सध्या बंद आहे. नव्या बदलामध्ये फलाट क्रमांक दोन उपलब्ध नसेल. त्यामुळे फलाट क्रमांक १ नव्या बदलानंतर फलाट क्रमांक ८ म्हणून ओळखला जाणार आहे. फलाट क्रमांक ३ हा ९, फलाट क्रमांक ४ हा १०, फलाट क्रमांक ५ हा ११, फलाट क्रमांक ६ हा १२, फलाट क्रमांक ७ हा १३ आणि फलाट क्रमांक ८ हा १४ म्हणून ओळखला जाणार आहे.
जुने फलाट क्रमांक | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
नवे फलाट क्रमांक | 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
करोनानंतर चीनमध्ये आणखी एका रोगाचा प्रादूर्भाव, भारताला धोका किती? केंद्र सरकार माहिती देत म्हणाले…
- चीनमध्ये H9N2 चा प्रादुर्भाव वाढला असून तेथील लहान मुलांमध्ये श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. करोनाप्रमाणे हा सुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने भारतीय नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. परंतु, केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H9N2) चा भारताला कमी धोका असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
- उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचा आजार वाढला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन देखील जारी केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
- चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू) चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आले. त्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. परिणामी, या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली चीनमध्ये नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला. आरोग्य संघटनेने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या H9N2 च्या मानवी प्रकरणांमध्ये मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. म्हणजेच, या आजाराचा संसर्गजन्य दर आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
- “भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य परिस्थितीसाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने एक समग्र आणि एकात्मिक रोडमॅपचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे.
‘पीएमएलए’ प्रकरणाची सुनावणी आता दुसऱ्या खंडपीठापुढे
- आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींच्या वैधतेबाबतच्या प्रकरणाची सुनावणी वेळेअभावी दुसऱ्या खंडपीठापुढे करण्यात येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. याप्रकरणावर युक्तिवाद सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी वेळ मागितल्याने आणि खंडपीठातील एक न्यायमूर्ती संजय किशन कौल हे २५ डिसेंबरला निवृत्त होणार असल्याने खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल वेळेत देण्याबाबत असमर्थता दर्शवली.
- या प्रकरणावर बुधवारपासून सुनावणी सुरू झाली होती. केंद्राची बाजू मांडणारे महान्यायवादी तुषार मेहता यांनी याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादावर म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारी आणखी वेळ मागितला. त्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली. या खंडपीठात न्यायमूर्ती कौल यांच्यासह न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांचा समावेश आहे.याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्जाद्वारे उपस्थित केलेल्या नव्या मुद्यांवर उत्तर दाखल करण्यासाठी खंडपीठाने केंद्र सरकारला चार आठवडय़ांची मुदतही दिली.
- या प्रकरणाची सुनावणी आता स्थगित करण्यात आल्यामुळे निकालासाठी पुरेसा वेळच मिळणार नाही. तसेच खंडपीठातील न्यायमूर्ती कौल निवृत्त होणार असल्याने सरन्यायाधीशांना या खंडपीठाची पुनर्रचना करावी लागेल. या संदर्भात सरन्यायाधीशांकडून आवश्यक आदेश मिळावेत, असेही खंडपीठाने नमूद केले.
प्रकरण काय?
- सर्वोच्च न्यायालयाच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने २७ जुलै २०२२ रोजी ‘पीएमएलए’मधील तरतुदींची वैधता कायम ठेवण्याचा निकाल दिला होता. त्यानुसार सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मिळालेल्या आरोपीच्या अटकेच्या आणि मालमत्ता जप्तीच्या अधिकारांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. मात्र, या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी विजय मदनलाल चौधरी यांनी केली आहे.