पावसाची ओढ, बळीराजाला घोर; २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, चिंता वाढली
Type Here to Get Search Results !

पावसाची ओढ, बळीराजाला घोर; २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, चिंता वाढली

 


मुंबई: राज्यात २४ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ८७ टक्के, तर एकूण ७५९.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातील खरीप पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी कमी झाली असून, १३९.११ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या पीकपाहणी अहवालातून समोर आली आहे. एकूणच ही आकडेवारी चिंताजनक आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागाने १ जून २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीबाबतचा पीक पाहणी अहवाल नुकताच तयार केला आहे. या अहवालातून वरील माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, राज्यात आत्तापर्यंत सरासरी ७५९.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर प्रत्यक्ष ६५८.७ मिमी पाऊस पडला असल्याची माहिती समोर आली आहे. १ जून ते २४ ऑगस्टपर्यंतच्या एकूण कालावधीच्या ५३ दिवसच २.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

राज्यातील एकूण २१ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के पाऊस पडला आहे. यात नाशिक (५), नंदुरबार (१), अहमदनगर (४), पुणे (३), सातारा (२), सांगली (२), कोल्हापूर (१), बुलढाणा (१), अकोला (१), अमरावती (१) या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात ८९ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे; तसेच १३१ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. ११४ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पाऊस पडला आहे.



पुण्यातून १३६ मंडलांत २१ दिवस खंड


पावसाच्या लपंडावामुळे राज्यातील २९७ महसूल मंडलांमध्ये २१ दिवसांपासून पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. तर, जवळपास ४९८ महसूल मंडळांमध्ये १५ ते २१ दिवस पावसाने पाठ फिरवल्याचे कृषी विभागाच्या पीक पाहणी अहवालात नमूद केले आहे. पुण्यात सर्वाधिक म्हणजे १३६ महसूल मंडलांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. त्याशिवाय १५ ते २१ दिवस खंड पडलेल्या पुण्यातील महसूल मंडलांची संख्या ७५ इतकी आहे.

काय आहे पीक पेरणीची परिस्थिती?

- यंदा १३९.११ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी

- गेल्या वर्षी हेच प्रमाण १४०.७७ लाख हेक्टर

- पाच वर्षांतील सरासरी प्रमाण १४२.०० लाख हेक्टर

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section